Maharashtra Board Text books

Maharashtra Board Class 11 Marathi निबंध लेखन Solution

1. अबला! नव्हे सबला!

समाजात पुरुष व महिला यांची निर्मिती निसर्गानेच केली. केवळ मानवी समाजातच नव्हे तर सर्व पशू व पक्ष्यांच्या अनेक जातींमध्येही ती व्यवस्था आहे. निसर्गनियमाप्रमाणे दोघेही समान हवेत. पण प्रत्यक्षात निसर्गाने मादीवर, स्त्रीवर पुनरुत्पत्तीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. असे असल्यामुळे खरे तर तिचे स्थान अधिक महत्त्वाचे हवे, पण प्रत्यक्षात जगातील विविध खंड, देश, प्रांत, धर्म, जाती, वर्ण या सर्व व्यवस्थांमध्ये महिलेचे स्थान बहुधा दुय्यम राहिले.

खरे तर या शतकभरात सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी उत्तुंग झेप घेतली आहे. अगदी खास पुरुषांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रांतही आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या शिरल्या आहेत. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होत आहे. लोकसंख्याशिक्षणाच्या प्रसारामुळे कुटुंब मर्यादित राखण्याची वृत्ती बळावत आहे. त्यामुळे स्त्रीवरील कौटुंबिक कामाचा ताण कमी होत आहे. विज्ञानजनित साधनांच्या वापरामुळे हा दैनंदिन कामाचा ताण सुसह्य होतो आहे. प्रसारमाध्यमांद्वारे ज्ञानविज्ञानात स्त्रीची गती वाढत आहे. अनेक क्षेत्रांत स्त्री-प्रतिमा उजळून निघाली आहे.

आजच्या स्त्रीमध्ये आत्मविश्वास, धडाडी आहे. तिच्या कर्तृत्वाची क्षितिजे विस्तारलेली आहेत. जीवनातील प्रत्येक संधी टिपण्यास ती उत्सुक असते. अतिशय हुशार आणि हिशेबी अशी आजच्या स्त्रियांची ओळख आहे. आजच्या स्पर्धेत त्या संसार, नोकरी आणि करिअर अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. मागील पिढीच्या तुलनेत प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या आजच्या मुली जीवनाचा सर्वार्थाने आस्वाद घेण्यास उत्सुक असतात.

या मुलींमध्ये लोकसेवेची जाण अधिक आहे. म्हणूनच मेधा पाटकर, किरण बेदी, मंदा आमटे, राणी बंग या सामाजिक क्षेत्रांत झोकून देणाऱ्या महिलांचे कर्तृत्व ठळकपणे जाणवते. आपल्यावर अन्याय झाल्यानंतर घर सोडून हजारो अनाथ मुलांची आई होणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना अबला कोण म्हणेल?

अशक्यप्राय गोष्टीही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांनी करता येऊ शकतात. हे आजच्या स्त्रीने सिद्ध करून दाखविले आहे. मग ती शिखरे सर करणारी कृष्णा पाटील असो किंवा दोन्ही ध्रुवांवर पॅराजंपिग करणारी शीतल महाजन असो.

प्रस्थापित राजकारणाच्या चौकटीतही स्त्रियांचा सहभाग वाढतच आहे. राष्ट्रपती या सर्वोच्च घटनापदी प्रतिभा पाटील आहेत. तर लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आहेत. लोकसभेचे अध्यक्षपदही मीराकुमारीच भूषवित आहेत. पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी यांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची आठवण आजही समाज काढत आहे. राजकारणात स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. आजच्या स्त्रीने घर आणि काम दोन्ही गोष्टी नजाकतीने पेलायची शक्ती आणलीय.

अर्थार्जनाच्या क्षेत्रात स्त्री रुळू लागली आहे. पाळण्याची दोरी हाती धरणाऱ्या स्त्रीच्या अंगी जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आले आहे. भारतासह इंग्लंड, कॅनडा, आखाती देश, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमधल्या आर्थिक बाजारातले आय. सी. आय. सी. आय. बँकचे सर्व प्रकारचे व्यवहार हाताळणारी शिल्पा शिरगावकर असो किंवा वैमानिक सौदामिनी देशमुख असो किंवा मोटारवुमन सुरेखा नाहीतर अंतराळवीर कल्पना चावला असो.

या साऱ्याजणी आता अबला नव्हे सबला असल्याचे दाखवून देत आहेत. आजची स्त्री वाऱ्याच्या वेगाने, कात टाकून सर्वार्थाने नव्या जगण्याकडे निघाली आहे.

2. माझा आवडता संत

महाराष्ट्र ही संतांची पावन-भूमी आहे. अनंत काळापासून या संतांनी समाजाला सन्मार्ग आणि सत्कर्माची दिशा दाखवली आहे. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचे महान कार्य या संत-महंतांनी केले आहे. संत कबीर, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा अशा असंख्य संतांनी या भूमीची माती पवित्र केली. या असंख्य संतांपैकी माझा आवडता संत म्हणजे ज्ञानियाचा राजा – संत ज्ञानेश्वर.

१२७५ मध्ये संत ज्ञानदेवांचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्ञानाचा उदय झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी या रत्नाने जन्म घेतला. . निवत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मक्ताबाई या चार भावंडांना त्या काळातील समाजाकडून त्रास सहन करावा लागला. समाजाने उपेक्षा केली तरी जन्मजात विद्वान आणि ज्ञानी असणाऱ्या संत ज्ञानदेवांची प्रतिभा बहरू लागली. बालपणातच ते विठ्ठल भक्तीत रमून गेले. वारकरी पंथाचे (संप्रदाय) त्यांनी पुनरुज्जीवन केले. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर.

संत ज्ञानदेव योगी, तत्त्वज्ञ, आणि प्रतिभासंपन्न कवी होते. साऱ्या जगाला तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे सुंदर दर्शन घडविणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘हरिपाठाचे व इतर अभंग’ ही त्यांची साहित्यसंपदा. सुंदर कल्पना, आलंकारिक पण ओघवती व प्रासादिक भाषा हे त्यांच्या लेखनाचे विशेष होते. संत ज्ञानेश्वरांनी समाजजागृती केली. अथक परिश्रम केल्यानंतर ते अवघ्या महाराष्ट्राचे ‘ज्ञानमाऊली’ झाले.

संत ज्ञानदेवांनी पसायदान मागितले.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो।
जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात।।

‘या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो’ अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली.

ही प्रार्थना सगळ्या जगासाठी आहे. चराचरासाठी आहे. ‘भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे’ ही तळमळ त्यामागे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही अवघे विश्व कवटाळणारी कल्पना संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात केली होती.

‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ अशा जयघोषामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी तल्लीन होऊन जातात. घराघरात संत ज्ञानेश्वरांचे अभंग गायले जातात. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. असा हा माझा आगळा-वेगळा आवडता संत तुम्हा सर्वांनाही आवडेलच.

3. नाट्यशिबिरातील आनंददायी क्षण

उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. यावर्षी कुठेही बाहेर फिरायला जायचे नव्हते. दहावीचा क्लास सुरू होणार होता. त्यामुळे वाचन, अभ्यास यात दोन महिने जाणार होते. पण त्या व्यतिरिक्त काहीतरी आपण वेगळं शिकायला हवे असे मला सतत वाटायचे. योगा, पोहणे वा नाटक असं काहीतरी. पण ही संधी अगदी घरी चालून आल्यासारखी झाली. आमच्या कॉलनीतील हॉलमध्ये ८ दिवसांचे एक नाट्यशिबिर आयोजित करण्यात आले होते.

सकाळी ८ ते १० वेळ असल्यामुळे माझ्या अभ्यासाचा खोळंबा होणार नव्हता. त्यामुळे मी लगेचच या शिबिरासाठी प्रवेश घेतला.

चार दिवसांनी शिबिर सुरू झाले. अगदी पहिल्याच दिवशी आमच्या ताईंनी आम्हा सर्वांची ओळख करून घेतली. शिबिरासाठी विविध वयाची साधारण ३०-३५ मुले मुली आम्ही होतो. ताईने नाटक म्हणजे काय? नाटकं करणं म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय या गोष्टी अगदी गप्पा गोष्टी करत समजावून सांगितल्या. दुसऱ्या दिवसापासून तिने पॅक्टिकली या गोष्टी समजावून सांगणार असे सांगितले आणि तिने पुस्तकातील एक नाट्यउतारा पाठ करून यायला सांगितले होते.

दुसऱ्या दिवशी ताईसोबत दोन दादाही आले होते. आमचे ५ ग्रुप करण्यात आले आणि ताईने आम्हाला बोलण्याचे काही खेळ शिकविले. केवळ ‘ळ’, ‘क’, ‘च’, ‘ठ’ या अक्षरांचा वापर करून त्याच्या गमतीजमती शिकता शिकता हसून हसून पुरेवाट लागली. या शाब्दिक खेळानंतर आम्हाला ताईने आरोह-अवरोह शिकवले. वाक्यातील कोणत्या शब्दावर जोर दिला की वाक्याचा कसा अर्थ बदलतो याचे प्रात्यक्षिक तिने आमच्याकडून करून घेतले.

हे करत असताना श्वासाचा कसा वापर करायचा हे तिने समजावून सांगितले. तिने एकाग्रतेसाठी श्वास रोखणे, जप करणे, योगा करणे किती महत्त्वाचे आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवले.

या शिबिरात केवळ नाटकाचे संवादच नाही तर कवितेचेही अभिवाचन कसे करावे, कथा कशी वाचावी याचे मार्गदर्शन केले. मी नेहमी एकसूरी वाचणारी होते पण ताईदादांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रकट वाचन करू लागले आणि माझ्या वाचनात कमालीचा बदल झाला. अभिनय करताना कसे उभे रहावे, कोणता कोन ठेवावा, प्रेक्षकांकडे दृष्टी कशी ठेवावी, केवळ आवाजावर भर न देता, चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील कंपनं, हंकार, श्वास यांचा मार्मिक वापरही आवश्यक असतो हे शिकायला मिळाले. केवळ कुणाचे तरी अनुकरण न करता त्यात आपली काही वैशिष्ट्ये घालून तो अभिनय परिपूर्ण करता येऊ शकतो.

आमच्या ५ ग्रुपला ताईने वेगवेगळे विषय दिले आणि त्यावर आम्हांला एक नाटुकलं लिहायला सांगितले. कोणत्याही विषयाकडे पाहताना तो विषय किती सखोल विचार करून लिहिता येतो ते दादांनी शिकविले. संवाद लिहिताना पल्लेदार व विशेषणांनी युक्त वाक्य लिहिण्यापेक्षा साध्या वाक्यरचनेतही संवाद लिहिता येतो याची जाणीव झाली. त्यात आणखी एक नवउपक्रम हाती घेतला तो म्हणजे चित्र काढण्याचा, त्या क्षणी जे मनात आहे ते उतरवणं काम होते पण त्यामधून प्रत्येकाच्या मनात धावणाऱ्या विविध भावभावनांचा वेध कसा घेता येतो याची परिपक्वता आली.

या सगळ्याबरोबर काही खेळही आम्ही खेळलो. ज्यात सतत आव्हाने होती. जीवनातही अनेक आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आपल्यांत असते. त्यासाठी हवा असतो तो आत्मविश्वास. आपल्या समोरची परिस्थिती कायमस्वरूपी नसते, त्यामध्ये चढउतार असणारच पण स्वत:वर विश्वास ठेवून त्या त्या परिस्थितीला सामोरे जायचे असते ही शिकवण या खेळांतून मिळाली.

शेवटच्या दोन दिवसात आम्ही तयारी करून एक छोटंसं नाटुकलं करून दाखवलं. त्या दोन दिवसांत आम्ही अगदी रंगभूमी वरचढ असल्याचा आवेश होता. घरीही तशाच पद्धतीने आम्ही बोलत होतो, घरीही सगळी गम्मत वाटत होती.

शेवटी ताईने पालकांसोबत आमचं एक गेट टुगेदर ठेवलं. आम्ही आमची नाटुकली पालकांसमोर सादर केली आणि त्यानंतर खाणं पिणं झाले. पालकांची मते मांडून झाल्यावर ताईने आमच्यापैकी ४-५ जणांना आपला अनुभव व्यक्त करायला सांगितला. वर्गात कधीही न उत्तर देणारी मी त्या दिवशी भरभरून बोलले. या शिबिरातून केवळ नाटकच नव्हे तर अभ्यास करतानाही काही क्लृप्त्या कशा वापराव्या, आयुष्यातही कसे वागावे याचा परिपाठ शिकायला मिळाला होता. असे हे नाट्यशिबिर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले खरे.

4. वाचाल, तर वाचाल

वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, ‘वाचाल, तर वाचाल’. हाच विचार मनात घेऊन प्रत्येकाने आपल्या मनाला वाचनाची सवय लावली पाहिजे. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडित वाचित जावे’ असा लेखन व वाचनाचा मंत्र समर्थ रामदास स्वामींनी सांगितला आहे. तुम्ही कोणत्याही ज्ञानशाखेचे विदयार्थी असू दया. आपल्या ज्ञानाला अदययावत ठेवण्यासाठी सतत वाचन हाच पर्याय आहे. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील नवे नवे ज्ञान व माहिती आत्मसात करावी लागते. त्यासाठी का होईना प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

नानाविध पुस्तकांचे जो वाचन करतो, त्यांतील विचार समजून घेतो तो जीवनप्रवासात नेहमीच इतरांच्या पुढे जातो. वाचनामुळेच आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध बनते. वाचनामुळेच आपली वैचारिक श्रीमंती वाढते. नवनवीन विचारांना स्फुरण मिळते. कल्पनाशक्ती तरल बनते. बहुश्रुत होण्यासाठी आपण सतत वाचलेच पाहिजे. ‘वाचनानंद’ हा एक वेगळाच अनुभव आहे. आपण वाचलेली माहिती केव्हा व कोठे उपयोगी पडेल ते सांगता येत नाही.

वाचलेल्या माहितीचे आदान-प्रदान केल्यास बऱ्याचदा नवीन मुद्देही मिळतात. विदयार्थी दशेत समजून घेऊन वाचनाची सवय मनाला लावली तर कोणताही अभ्यासविषय नक्कीच सुलभ वाटू लागतो. मन लावून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. केवळ वरवरचे उथळ असे वाचन काहीही कामाचे नाही.

विदयार्थी दशेतच अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय मनाला लावल्यास आपले विचार प्रगल्भ होतात. प्रगल्भ विचारांमुळे भविष्यातील जीवनवाटचाल सुकर व यशस्वी होते.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या वेबसाईट्स्वर एका क्लिक् सरशी जगभरातल्या लेखकांची पुस्तके हव्या त्या भाषेत उपलब्ध होतात. अनेकजण ती आवडीने वाचतात. नवनवीन साईट्स्वर जाऊन माहिती मिळवतात. मिळवलेली माहिती ब्लॉग वा इतर सोशल मिडीयाद्वारे शेअरही करतात. म्हणूनच वाचनसंस्कृती लोप पावली नाही तर बदलत्या कालमान परिस्थितीनुसार वाचन संस्कृतीनेही आपली कूस बदलली असे वाटते. वाचनाची माध्यमे बदलली.

पूर्वीच्या पुस्तकांची जागा ई-बुक्सनी घेतली. छोट्या घरात पुस्तके ठेवायला जागा नाही हा अनेकांचा प्रश्न डिजिटल क्रांतीने, अनेक पुस्तकांच्या ऑनलाईन आवृत्त्यांनी खरोखरच सोडवला. संस्कृतात ‘वचने किम् दरिद्रता’ असे एक वचन आहे. बोलण्यात कंजुषी कशाला करावी असा त्याचा अर्थ आहे. ‘वचने’ या शब्दात (एक काना, एक मात्रेचा) बदल करून वाचन करण्यात कसली आली आहे कंजुषी असे म्हणायला हरकत नाही.

जे उपलब्ध होईल ते व्यक्तीने वाचून समजून घ्यावे. चौफेर अशा वाचनामुळेच तुमच्यात चतुरस्रता निर्माण होणार आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे. विविधांगी व विधांगी वाचनामुळेच लेखनाची प्रवृत्ती प्रबळ होते. रसिकता वाढीस लागते. सहृदयता म्हणजेच दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव असणाऱ्या संवेदनक्षम मनास खतपाणी मिळते.

5. झाड बोलू लागले तर…..

नमस्कार ! मी तुमचा मित्र, झाड बोलत आहे. पण तुम्ही खरेच माझे मित्र आहात का? तुम्हाला वाटेल मी असे का बोलत आहे? पण मी आज जे अनुभवत आहे ते तुम्हांला सांगावसे वाटले म्हणून हा प्रयत्न.

तुम्ही म्हणता ना झाडे मानवाचा मित्र आहेत. परंतु तुम्ही माझ्याबरोबर मित्रासारखे वागता का?

मी तुमच्या खूप उपयोगी पडतो. मी प्रत्येक सजीवाला नि:स्वार्थवृत्तीने काही ना काही देतच असतो. माझ्या सुगंधी फुलांनी तुमचे मन प्रफुल्लित होते. माझी गोड फळे चाखून तुम्ही किती खुश होता. मी इंधनासाठी, घरे बांधण्यासाठी लाकूड देतो. थकल्या भागल्या वाटसरूला शीतल छाया देतो. पक्ष्यांना माझ्यामुळे आश्रय मिळतो. प्राणी माझ्या सावलीत विश्रांती घेतात.

तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या कागद, रबर, ब्रश, गोंद कितीतरी वस्तू माझ्यामुळे तुम्हाला उपलब्ध होतात. मध, औषधे तयार केली जातात. माझा प्रत्येक अवयव तुमच्या उपयोगी पडतो.

माझ्या मुळांमुळे जमिनीची धूप थांबते. माझी वाढ झाली तर पाऊस पडतो. पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्व सजीव तृप्त होतात. दुष्काळ आणि पूर दोन्ही आटोक्यात येतात. सर्व सजीवसृष्टीला जगण्यासाठी मी प्राणवायूचा पुरवठा करतो आणि मानवाला अपायकारक असणारा कार्बनडाय ऑ क्साइड वायू शोषून घेतो.

परंतु आता माझे महत्त्व तुम्ही विसरत चालले आहात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ या ओळी आता फक्त पुस्तकातच राहिल्या आहेत. आजच्या गतिमान वैज्ञानिक युगात माझ्यावर तुम्ही आक्रमण करू लागला आहात. सिमेंट, काँक्रीटच्या इमारती उभारण्यासाठी, रस्ते दुरुस्ती करण्यासाठी, विकासाच्या नावाखाली तुम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहात. तुम्ही माझ्यावर कु-हाड चालवता तेव्हा मला खूप दुःख होते रे!

माझा संहार करू लागल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वातावरणात बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जंगलातील प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. नदया कोरड्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

म्हणून मी तुम्हाला मन:पूर्वक विनंती करतो की मी नसलो तर तुमचे संपूर्ण जीवन रुक्ष होईल. सर्व सजीवसृष्टी संपुष्टात येईल. याचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील. अनेक संकटांना सामोरे जावे लागेल.

पर्यावरणाचा हास थांबवण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देता तेव्हा मला खूप आनंद होतो. निसर्गाबाबत तुमची स्वार्थी वृत्ती पाहून मला खंतही वाटते आणि तुमची काळजीही. पर्यावरणाची काळजी घ्या. निसर्ग संवर्धन करा. ती काळाची गरज आहे. आजूबाजूच्या परिसरात खूप झाडे लावा. त्यांची जोपासना करा. कारण मला रुजायला, फुलायला, वाढायला खूप काळ लागतो. बदलणारे निसर्गाचे चक्र पूर्ववत करण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांचीच आहे. मला जगवाल तर तुम्ही जगाल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या सहवासात राहून आनंदी, निरोगी रहा आणि दीर्घायुषी व्हा.

6. ‘मायबोलीचे मनोगत

‘झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा होत नाही
त्याला वेदना होत नाही’

मी मायबोली राजभाषा मराठी! तुम्हाला दिसतोय तो राजभाषेचा सोनेरी मुकुट, पण माझ्या मनीचे दुःख मात्र तुम्हाला दिसत नाही. माझ्या दयनीय अवस्थेचे रडगाणे सर्वचजण गातात. पण माझी स्थिती सुधारण्याचे उपाय मात्र योजले जात नाहीत.

तेराव्या शतकात देवी शारदेच्या दरबारातील एक मानकरी – माझा सुपुत्र – संत ज्ञानेश्वरांनी माझा पाया रचला. केवढा अभिमान वाटत असे त्यांना माझा! ‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ या शब्दांत त्यांनी माझा गौरव केला. माझी कूस धन्य झाली.

खरे तर माझी जन्मदात्री गीर्वाण भाषा संस्कृत. तिच्याच उदरी माझा जन्म झाला. देवाने माझ्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्याला सहयाद्री व सातपुड्याची खेळणी लावली. कृष्णा-गोदेचा गोफ विणून पाळणा हलवायला दोरी बनवली. देवी रेणुकामाता व देवी तुळजाभवानी यांनी माझ्यासाठी पाळणा म्हटला. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास या संतांनी तर वामन पंडित, मुक्तेश्वर, मोरोपंत या पंडितांनी तसेच त्यानंतर शाहीर अमरशेख, शाहीर होनाजीबाळा यांनी मला समृद्ध केले.

मी जशी संत ज्ञानेश्वरांची, संत तुकारामांची तशी छत्रपती शिवरायांची आणि पेशव्यांच्या बाजीरावांची! जशी ज्योतीबा फुल्यांची तशी चाफेकर बंधूंची! मी लोकमान्य टिळक – गोपाळ गणेश आगरकरांची तशी बाबासाहेब आंबेडकरांची! जशी परक्या सत्तेविरुद्ध बंड पुकारणारी तशी क्रांतीच्या जयजयकाराला ज्ञानपीठावर गौरवित करणारी!

काळाबरोबर मी अनेक भाषाभगिनींना माझ्यात सामावून घेत गेले. दिसामासांनी मी वाढत होते. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, केशवसुत, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर यांच्या बाळगुटीने मी बाळसे धरू लागले होते. म्हणूनच राजभाषेचा मानही मला मिळाला. किती आनंद झाला मला त्या दिवशी! पण हा आनंद अळवावरच्या पाण्यासारखाच निघाला.

माझ्याच सुपुत्रांनी मला दरिद्री केले. माझी अवस्था दयनीय झाली असे रडगाणे गात त्यांनी माझा अपप्रचारच केला. माझा वापर करणे त्यांना कमीपणाचे वाटते. आपल्या मुलांना मराठी शाळेत घालणे त्यांना मागासलेपणाचे लक्षण वाटते. मराठीच्या प्रचाराच्या गोष्टी करणारे हे महाभाग स्वत:च्या मुलांना व नातवांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाठवतात. माझ्या विकासासाठी कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

ज्या माझ्या सुपुत्रांनी मला वैभवशिखरावर पोहोचवले होते, त्याच सुपुत्रांच्या आजच्या राजकारणी वारसदारांनी मात्र मला देशोधडीला लावण्याचेच काम केले. आज माझ्यात दर्जेदार साहित्यनिर्मिती होत नाही, अशी ओरड होऊ लागली आहे. माझ्या माध्यमाच्या शाळा ओस पडून बंद पडू लागल्या आहेत. मी संपेन की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या सर्वांना मी ठणकावून सांगू इच्छिते की मी अशी-तशी संपणार नाही. ज्ञानदेवाने जिचा पाया इतका मजबूत रचला आहे ती मी अशी सहजा सहजी ढासळणार नाही. अर्थात माझं गतवैभव परत मिळवायला मला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. आज सारे ज्ञान-विज्ञान इंग्रजी भाषेत निर्माण होत आहे, संगणकाची भाषासुद्धा इंग्रजी आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाने परकीय भाषांतील ज्ञान-विज्ञान माझ्यात निर्माण करा.

रटाळ, लांबलचक माहिती लिहिलेली पुस्तके लिहिण्यापेक्षा रंगीत चित्रांनी युक्त मोजक्या शब्दांत माहिती लिहिलेली आकर्षक पुस्तके निर्माण करा. काळाप्रमाणे बदलायला शिका. नवीन नवीन बदल स्वीकारा. ‘जुने ते सर्वच चांगले व नवीन ते सर्वच वाईट’ असे समजू नका. संगणकात माझ्या भाषेत माहिती निर्माण करा. त्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करा. मराठीतून बोलण्याची, शिकण्याची लाज बाळगू नका. मुख्य म्हणजे माझा अपप्रचार थांबवा.

मग बघा मला पुन्हा माझे गतवैभव प्राप्त होते की नाही?